‘न्यूटन’ हा चित्रपट अभिनेता राजकुमार रावच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. त्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘न्यूटन’ या चित्रपटाची निवड ‘ऑस्कर’ पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून करण्यात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमारने ऑस्करबद्दलची उत्सुकता व्यक्त केली.
‘नवीन वर्ष सर्वांसाठी आनंददायी ठरो, अशी मी आशा करतो. नव्या वर्षात ‘न्यूटन’साठीही चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालणं मला नक्कीच आवडेल, पण त्याची स्वप्नं मी पाहत नाहीये,’ असं तो म्हणाला. यावेळी त्याला कोणाच्या हस्ते ऑस्कर पुरस्कार स्वीकारणं आवडेल, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर दिलं की, ‘मेरिल स्ट्रीप किंवा डॅनियल डे लुईसकडून पुरस्कार स्वीकारायला आवडेल. पुरस्कार कोणाकडून मिळणार हे फार महत्त्वाचं नाही पण भारताला तो मिळावा अशी आशा मी करतो.’
वाचा : धर्मेंद्र यांनी बिग बींवर साधला निशाणा
‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात आणि ‘बोस : डेड ऑर अलाइव्ह’ या वेब सीरिजमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकेचीही बरीच प्रशंसा झाली. तर यंदाच्या ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता असे दोन पुरस्कारही राजकुमारने पटकावले.