बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या चार वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीवर खटला दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. जियाची आई राबिया खान यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दिली. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने सूरजवर खटला दाखल करण्याचे आदेश दिले.

कतरिना कैफ क्रिकेट खेळते तेव्हा…

वकिल दिनेश तिवारी यांना या प्रकरणात विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्त केले जावे अशी मागणी राबिया खान यांनी या याचिकेत केली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता ११ सप्टेंबर ही तारीख दिली आहे. जियाने ३ जून २०१३ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी सूरजला १० जूनला अटकदेखील करण्यात आले होते. मात्र नंतर तो जामिनावर सुटला होता.

जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. याप्रकरणी सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोपपत्र सीबीआयने दाखल केले. त्यानंतर राबिया यांनी पुन्हा एकदा याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची समिती नेमण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र जिया खान हिने आत्महत्याच केली असा निष्कर्ष सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी दिल्यामुळे त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली होती. आता या प्रकरणात ११ सप्टेंबरला कोणते नवे वळण येते हेच पाहावे लागेल.