विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्नासाठी इटलीला रवाना झाल्याच्या चर्चा आहेत. बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या सेलिब्रिटी जोडीने एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. किंबहुना त्यांच्या लग्नाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्येही बरीच उत्सुकता पाहायला मिळत असून, विरुष्काच्या लग्नाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेकजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आणखी एक वृत्त समोर आले आहे. इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा बेत आखणाऱ्या विराट आणि अनुष्काला त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी एका जगप्रसिद्ध ठिकाणहून बोलावणे आले आहे.
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध अॅडलेड ओव्हल स्टेडियमच्या व्यवस्थापकीय मंडळाने विराट- अनुष्काच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘अॅडलेड ओव्हलमध्ये विराट- अनुष्काच्या लग्नाचे आयोजन करणे आमच्यासाठी परवणीच असेल. या मैदानावरील विराटची कामगिरी पाहता त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण इथे आकारास येणं ही खूप सुरेख बाब असेल’, असे ओव्हल स्टेडियमचे सीईओ अॅन्ड्र्यू डॅनिअल्स ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?
ऐतिहासिक ओव्हल स्टेडियम आणि विराट कोहली यांच्यात एक सुरेख नाते जपले गेले आहे. आतापर्यंत आपल्या दमदार खेळीने जगभरातील क्रिकेट मैदानांवर नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या विराट कोहलीचे ओव्हल स्टेडियमशी खास नाते आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तीनदा शतक ठोकले आहे. त्याशिवाय टी-२० सामन्यातील सर्वाधिक ९० (नाबाद) धावाही कोहलीने याच मैदानावर केल्या होत्या. कोहलीची ओव्हल मैदानातील कामगिरी ही लक्षवेधी आहे. त्याने या मैदानात ८ डावात ८९ च्या सरासरीनं ६२४ धावा केल्या आहेत. ही आकडेवारी आणि ओव्हल मैदानाकडून आलेले बोलावणे पाहता आता विराट काय निर्णय घेतो याकडेच चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.