गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याच चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण अनुष्का आणि विराट नुकतेच इटलीला रवाना झाले. गुरुवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावरुन अनुष्का तिच्या संपूर्ण कुटुंबासह इटलीला रवाना झाली. तर विराटही दिल्लीहून इटलीला निघाला.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन अनुष्का आणि तिचे कुटुंबिय इटलीला रवाना होत असतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये अनुष्का तिची आई आशिमा शर्मा आणि वडील अजय कुमार शर्मा यांच्यासोबत दिसली. त्यावेळी मोठा भाऊ कर्णेश शर्माही त्यांच्यासोबत होता. अनुष्का आणि तिचे कुटुंबिय विमानतळावर येताच छायाचित्रकार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भोवती गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनुष्का माध्यमांसमोर तिच्या इटली दौऱ्याविषयी काही खुलासा करणार का, याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. पण, तिने याविषयी काहीही न बोलण्यास प्राधान्य दिले नाही.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

तीन दिवस विवाहसोहळा रंगणार असून, इटलीला जाण्यापूर्वी अनुष्का दुबईला लग्नाची खरेदी करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यानंतर सिंगापूर आणि लंडन येथेही हे लग्नाचं वऱ्हाड जाणार असल्याचं कळतंय. अनुष्का आणि विराटने त्यांच्या बाजूने लग्नाविषयीची कोणतीच अधिकृत घोषणा केली नसली तरीही सध्या सुरु असणाऱ्या सर्व घटनांचा आधार घेत ते लग्नगाठ बांधणार असल्याचं उघड झालं आहे. किंबहुना त्यांच्या लग्नासाठी बॉलिवूड आणि क्रीडा विश्वातूनही बराच मोठा मित्रपरिवार जाण्याची चिन्हं आहेत. शेजाऱ्यांनाही या सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाचे निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वत्र विराट आणि अनुष्काच्या लग्नाकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.