राष्ट्रवादाचा प्रश्न येतो तेव्हा संपूर्ण बॉलीवूड एकजूट होते. पण यात जेव्हा राजकारणी लोकं प्रवेश करतात तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी भयभीत आणि कमजोर होते, असे बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अजय देवगण याने म्हटले आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान अजय काजोलसह उपस्थित होता. त्याचवेळी त्याने याविषयी आपले मत मांडले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. त्यावरच अजयने आपले मत मांडले. हा राष्ट्रवाद आहे की भीती असा प्रश्न विचारण्यात आला असता अजय म्हणाला की, दोन्ही. राष्ट्रवादाचा प्रश्न येतो तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे देशासोबत आहे. पण जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा बॉलीवूड विश्वातील व्यक्ती थोडीशी घाबरते. जर आज तुम्ही कोणत्या समूहाविरोधात बोललात तर तुमच्या चित्रपटावर बंदी घातली जाते आणि काहीही होऊ शकते, याच कारणामुळे ते राजकारणाला घाबरतात. जिथे राजकारणाचा विषय येतो तिथे आम्ही नेहमीच चिंतेत असतो. ४७ वर्षीय या अभिनेत्याच्या मते, राजकारणाचा विषय येतो तेव्हा अनावश्यक वादाला सामोरे जावे लागू नये म्हणून लोकं आपलं मत मांडण्यास घाबरतात.
पुढे तो म्हणाला की, आम्ही कमजोर आहोत त्यामुळे आम्हाला राजकारणापासून दूर राहायचे आहे. पण जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा मी तिथे उभा असतो. राजकारणाचा विषय येताच तुम्ही घाबरून गप्प बसता. समाजाप्रमाणे बॉलीवूडही विभागलेलं आहे. मात्र, धर्माचा विषय येतो तेव्हा चित्रपटसृष्टीसाठी हा काही मुद्दा नाही. हेच बॉलीवूडचे सर्वात खास वैशिष्ट्य आहे. मनोरंजनामध्ये धर्माची समस्या येत नाही. राजकीय किंवा धार्मिक परिस्थिती काहीही असो, आमच्या चित्रपटांमध्ये काम करणारे लोक हिंदू, मुस्लिम, पारसी, इसाई आहेत. आम्ही दिवाळी आणि ईद एकत्र साजरी करतो. मी केवळ माझ्या एकट्याच्या चित्रपटाबाबत बोलत नसून संपूर्ण चित्रपट जगताबाबत बोलत आहे. आमच्यासमोर धर्माची समस्या कधीच आली नाही, हेच आमचे वैशिष्ट्य आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांना घालण्यात आलेल्या बंदीवर अजयने आपण याआधी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम केल्याचे सांगितले. तसेच, पाकिस्तानी कलाकारांना पूर्णपणे बंदी घालू नये असेही त्याचे म्हणणे आहे. याबाबत अजय म्हणाला की, मी पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत काम केले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले गाणे नुसरत फतेह साहेब यांनी कच्चे धागे चित्रपटासाठी दिले होते. आपण भविष्यातही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला हवे. पण आपण देशासोबत राहणेही गरजेचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2016 रोजी प्रकाशित
बॉलीवूड विश्व राजकारणाला घाबरलेय- अजय देवगण
ज तुम्ही कोणत्या समूहाविरोधात बोललात तर तुमच्या चित्रपटावर बंदी घातली जाते
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 22-10-2016 at 18:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian film industry is scared of politics says ajay devgn