सध्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शोमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. पण त्यांनी हजेरी लावलेला एपिसोड प्रदर्शित होताच अमित यांनी शोवर टीका केली. त्यानंतर शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने स्पष्टीकरण दिले होते. आता अनुराधा पौडवाल आणि रुप कुमार हे पाहुणे म्हणून शोमध्ये आले आहेत. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये अनुराधा यांनी अमित कुमार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच अनुराधा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना सध्या इंडियन आयडल १२ वरुन सुरु झालेल्या वादाविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘माझ्यासाठी हे धक्कादायक होतं. कारण सर्वच स्पर्धक खूप मेहनती आणि टॅलेंटेड आहेत. पण त्यांच्या टॅलेंटवर प्रश्न उभे केले जात आहेत हे ऐकून मला धक्काच बसला.’

वाचा : Indian Idol 12, सायली कांबळेचे वडील करोना रुग्णांसाठी चालवतात रुग्णवाहिका

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला अमित यांच्या वादाग्रस्त वक्तव्याबद्दल काही माहिती नव्हते. मी जेव्हा इंडियन आयडलमध्ये गेले तेव्हा सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक चांगली गाणी गायिली. सगळ्यांचा परफॉर्मन्स पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वच स्पर्धक टॅलेंटेड आहेत.’

वाचा : ‘अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर..’, इंडियन आयडलमधील ‘त्या’ वादावर अभिजीत सांवतची प्रतिक्रिया

इंडियन आयडलच्या आगामी भागामध्ये अनुराधा पौडवाल, रुप कुमार आणि कुमार सानू हे पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण अमित कुमार यांची खिल्ली उडवताना दिसणार आहे. तो पाहुणे म्हणून आलेल्या परिक्षकांना शोच्या शेवटी एक प्रश्न विचारताना दिसणार आहे. ‘सानू दा, रुप कुमार आणि अनुराधा पौडवाल तुम्ही आमच्या स्पर्धकांची प्रशंसा केली ती मनापासून केली की आमच्या टीमपैकी तुम्हाला कोणी असे करण्यास सांगितले होते?’ असा प्रश्न आदित्य विचारताना दिसणार आहे.

काय होता वाद?
अमित कुमार यांनी हजेरी लावलेल्या एपिसोडमध्ये परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते’ असे म्हटले होते.