सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारवर नाव कोरणाऱ्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानु अथैया यांचं निधन झालं आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप कळलेलं नाही. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ऑलंपिक पदक क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जातो. अगदी त्याच प्रमाणे ‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मानबिंदू मानला जातो. भारताला हा सन्मान सर्वात आधी मिळवून दिला तो भानु अथैया यांनी. प्रसिद्ध वेशभूषाकार भानु अथैया ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच यात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांनी देखील काही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु हा चित्रपट विशेष गाजला तो बेन किंग्सले यांचा जबरदस्त अभिनय आणि भानु अथैया यांची वेशभूषा यामुळे.

या चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कपड्यांचे डिझाईन्स भानू अथैया यांनी तयार केल्या होत्या. अगदी गांधींनी नेसलेल्या सुती धोतरापासून कस्तुरबा गांधी यांच्या साडीपर्यंत सर्व काही वेशभूषाकार भानू अथैया यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करण्यात आले होते. या कामगिरीसाठी त्यांना १९८३ साली ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत केले गेले. त्यानंतर २००१ साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र थोडक्यात त्यांचा हा पुरस्कार हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. यासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.

Story img Loader