international womens Day 2019 : जगभरामध्ये महिलांच्या सन्मानासाठी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. कलाक्षेत्रही याला अपवाद नाही. बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो येथेही महिलांनी स्वत: ला सिद्ध केलं आहे. कलाक्षेत्रामध्ये आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये असेही काही चित्रपट आहेत जे केवळ अभिनेत्रींमुळे सुपरहिट ठरले आहेत. चला तर मग पाहुयात अभिनेत्रींनी गाजवलेले काही चित्रपट –

१. राझी –
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टचा राझी हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटामध्ये आलिया मुख्य भूमिकेत झळकली असून तिने महिला गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये कोणत्याही दिग्गज अभिनेता झळकला नव्हता. तरीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाने तिकीटबारीवर १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटावर प्रेक्षकांसोबतच चित्रपट समिक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव केला होता.

२. नीरजा –
सावरिया चित्रपटातून अभिनेत्री सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपटा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटाच्या अपयशानंतर सोनमवर फ्लॉप अभिनेत्री म्हणून ठपका बसला. परंतु नीरजा या चित्रपटातून सोनमने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं. हा चित्रपट नीरजा भानोत या शूर उड्डाणसेविकेवर आधारित असून सोनम या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशानंतर सोनमच्या पदरात अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.

३. सरबजीत
या चित्रपटामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन झळकली असून तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुड्डाने स्क्रीन शेअर केली आहे. मात्र हा चित्रपट ऐश्वर्यामुळे बॉक्स ऑफिसवर गाजल्याचं पाहायला मिळालं.

३. मेरी कोम-
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक क्रीडापटूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती होतांना दिसत आहे. खरं पाहायला गेलं तर या नव्या ट्रेण्डची सुरुवात मेरी कॉम या चित्रपटामुळे झाल्याचं पाहायला मिळतं. या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच गाजला नाही. तर या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले.

४. मर्दानी –
अभिनेत्री राणी मुखर्जीचा बॉलिवूडमधील वावर आता कमी झाला आहे. मात्र तिचा ‘मर्दानी’ हा चित्रपट आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्षात आहे. या चित्रपटामधअये राणीने एका महिला पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे.

५. द डर्टी पिक्चर –
‘द डर्टी’ हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका साकारली आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये विद्यासोबत नसीररुद्दीन शहा आणि इम्रान हाश्मीदेखील झळकले आहेत. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयामुळे हा चित्रपट तिकीटबारीवर सुपरहिट ठरला होता.