चित्रपटसृष्टीतील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर सर्वत्र या विषयाची चर्चा होऊ लागली. केवळ हॉलिवूड नाही तर बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडतात, असंही मत अनेकांनी मांडलं. तर अभिनेता इरफान खानने याप्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. सुरुवातीच्या काळात मलाही तडजोड करण्यास सांगितल्याचं धक्कादायक वक्तव्य इरफानने केलं.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इरफान म्हणाला की, ‘माझ्यासोबतंही असं अनेकदा घडलंय. त्यांचं नाव उघड करणं आता योग्य नसेल, पण काम मिळण्यासाठी कधी अप्रत्यक्षपणे तर कधी थेट मला तडजोड करण्यास सांगितलं गेलं. मात्र, आतापर्यंत तसं काही घडलं नाही. सेक्ससाठी मला स्त्री आणि पुरुषांकडूनही विचारलं गेलं. तुम्ही ज्यांना ओळखता, ज्यांचा आदर करता अशा लोकांनी आपल्याकडं विचारणं खूप विचित्र वाटतं. मात्र, त्याला होकार किंवा नकार देणं हे माझ्या हातात होतं.’

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘लाइफ ऑफ पाय’ या हॉलिवूड चित्रपटांत भूमिका साकारलेल्या इरफानच्या मते दोघांच्या संमतीशिवाय केलेल्या अशा गोष्टी चुकीच्याच आहेत. शिवाय पुरुषांपेक्षा महिलांनाच तडजोडीसाठी जास्त विचारणा केली जात असल्याचंही त्याने सांगितलं.

वाचा : लैंगिक शोषणाविरोधात रिचा चड्ढानेही उठवला आवाज; समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर केले भाष्य

हार्वेसारखे लोक फक्त हॉलिवूडमध्येच नसून बॉलिवूडमध्येही आहेत, असं अभिनेत्री प्रियांकाने चोप्रानेही म्हटलं होतं. हार्वेनंतर जेम्स टोबॅक या हॉलिवूड दिग्दर्शकावरही ३८ अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. सोशल मीडियावरही गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा गाजत असून ‘मी टू’ #MeToo या हॅशटॅगची मोहिमच राबवली जात आहे. जगभरातील महिला सोशल मीडियावर लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत.