‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरांत पोहोचला. त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अमराठी असलेला ऋषी सक्सेना मराठी प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला. मालिकेनंतर ऋषी काय करतोय, त्याचे नवीन प्रोजेक्ट्स काय आहेत, हे जाणून घेण्याची त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर चित्रपटांकडे वळण्याची सर्वच कलाकरांची इच्छा असते. त्यातही बॉलिवूडचं विशेष आकर्षण हे कलाकारांमध्ये असतंच. याला ऋषीसुद्धा अपवाद ठरला नाही. मालिका संपत आली होती तेव्हापासूनच ऋषी त्याच्या बॉडीवर विशेष मेहनत घेत आहे. मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्याला अनेक हिंदी चित्रपटांचे ऑफर्स आले होते. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठीच तो देहयष्टीवर आणि लूकवर मेहनत घेत आहे.

वाचा : ‘शेफ’साठी सैफने कापले होते हजारो कांदे

गेल्या काही दिवसांमध्ये ऋषी हिंदी मालिका किंवा वेब सीरीजमध्ये झळकणार असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ऋषीकडून समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे आणखी एखाद्या मराठी मालिकेत भूमिका साकारण्याचीही त्याची इच्छा आहे. ”काहे दिया परदेस’सारखा मराठी प्रोजेक्ट परत मिळणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. मात्र त्याच धाटणीचा एखादा मराठी चित्रपट मिळाला तरी मला तो करायला आवडेल’, असं तो म्हणाला. मात्र सध्या त्याचं सर्व लक्ष बॉलिवूडकडेच आहे. रुपेरी पडद्यावर ऋषीला भूमिका साकारताना पाहणं त्याच्या चाहत्यांनाही नक्कीच आवडेल.