गेल्या वर्षी २०१७ मध्ये गाजलेल्या वादांमध्ये बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा अग्रस्थानी राहिला. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहर आणि ‘क्वीन’ कंगना रणौत यांच्यातील घराणेशाहीचा वाद बराच गाजला होता. करणच्या ‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी चॅट शोने घराणेशाहीच्या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांवर बरीच चिखलफेक केली होती. मात्र, आता करण हा वाद विसरुन कंगनाच्या दिशेने पुन्हा मैत्रीचा हात पुढे करत असल्याचे चित्र आहे.
वाचा : पत्नीसाठी कधी सॅनिटरी पॅड आणता का?
नुकताच करण आणि रोहित शेट्टीने ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’ हा रिअॅलिटी शो लाँच केला. करण आणि रोहित या हिट दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी २० स्पर्धकांमध्ये शोमध्ये चुरस रंगणार आहे. कार्यक्रमात दोन्ही दिग्दर्शकांना सुत्रसंचालक आणि प्रसार माध्यमांनी बरेच प्रश्न विचारले. शोच्या विजेत्याला तुमच्या चित्रपटामध्ये काम मिळणार का? यापासून अनेक विविध प्रश्नांचा यात समावेश होता. मात्र, करणने दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावण्यास भाग पाडले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने करणला, या शोमध्ये प्रियांका पाहुणी म्हणून येणार आहे तर कंगनालासुद्धा त्यासाठी आमंत्रण देण्यात येणार का, असा सवाल करताच ‘ऐ दिल है मुश्किल’ फेम दिग्दर्शक यावर आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. कदाचित असा एकही प्रश्न नसेल ज्याचे उत्तर करणकडे नाही. आपल्या बुद्दी चातुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या करणने दिलेल्या उत्तरामुळे भविष्यात कदाचित कंगना आणि त्याच्यामधील वादळ क्षमण्याची शक्यता आहे.
वाचा : नव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले घसघशीत मानधन
करण म्हणाला की, ‘स्टार प्लसने तिला आमंत्रण दिले तर आम्हालाही त्याचा आनंदच आहे. आमचं मन खूप मोठं असून सर्वांसाठी घराचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना कोणाला आमंत्रण जाईल त्यांनी आवर्जून शोमध्ये यावे अशीच आमची इच्छा आहे. आम्ही प्रेम आणि आदराने त्यांचे स्वागत करू.’ करणच्या या वक्तव्यावर कंगना काय उत्तर देणार हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.