अभिनेता राजकुमार रावचा ‘न्यूटन’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरल्याने अनेकांकडून कौतुकांचा वर्षाव झाला. ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘न्यूटन’ची निवड करण्यात आली. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने २६ चित्रपटांमधून याची निवड केली. एकीकडे या निर्णयाने सर्वजण आनंदीत असतानाच बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मात्र नाराज असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ वेबसाइटने दिलं आहे.

‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ज्या २६ चित्रपटांची निवड केली होती, त्यामध्ये प्रियांकाची निर्मिती असलेला ‘व्हेन्टिलेटर’ हा चित्रपटसुद्धा होता. मात्र समितीने ‘न्यूटन’ची निवड केली आणि हीच गोष्ट प्रियांकाला खटकल्याचं दिसतंय. ‘व्हेन्टिलेटर’ची संपूर्ण टीम २२ सप्टेंबरच्या निकालाची फार आशेने वाट बघत होती असं दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितलं. मात्र दुसऱ्या दिवशी ‘व्हेन्टिलेटर’ची निवड न झाल्याचं ऐकून आमची निराशा झाली असंही ते म्हणाले.

वाचा : बहारिनच्या राजकुमाराशीही जॅकलिनचे अफेअर?

प्रियांकाच्या प्रतिक्रियेबद्दल ते पुढे म्हणाले की, ‘या चित्रपटासाठी ती सुरुवातीपासूनच खूप उत्सुक होती. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त तिची निराशा झाली असणार हे नक्की. जर ‘व्हेन्टिलेटर’ची निवड ऑस्करच्या शर्यतीसाठी झाली असती तर प्रियांकाने या चित्रपटाचा जोरदार प्रचार केला असता. याशिवाय ऑस्करमध्ये ती आधीच एक प्रसिद्ध चेहरा आहे.’ प्रियांकासोबतच तिची आई मधू चोप्रासुद्धा ‘व्हेन्टिलेटर’साठी खूप उत्सुक होत्या आणि समितीचा निकाल ऐकल्यानंतर त्यांचीही निराशा झाल्याचं मापुस्कर यांनी सांगितलं.