सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामी गट आणि इतर पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांनी तेल अवीव आणि बिर्शेबा येथे रॉकेट हल्ले केल्यामुळे इस्रायलने बुधवारी सकाळी गाझावर शेकडो हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये ३५ पॅलेस्टाइनमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच घटनांनमुळे सध्या सोशल मीडियावर देखील वाद रंगू लागले आहेत.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादाचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. यातच आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत आणि क्रिकेटर इरफान पठाण यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काही ट्विट करत इरफान पठाणने पॅलेस्टाइनचं समर्थन केलं होतं. तर त्याच्या या ट्विटवर अभिनेत्री कंगना रणौतने एक पोस्ट शेअर करत या वादात उडी घेतली आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्यामुळे तिने इन्स्ट्रागामवर स्टोरी शेअर करत पुन्हा वाद ओढावून घेतला आहे.

इरफान पठाणने एक ट्विट केलं यात तो म्हणाला, ” जर तुमच्यात थोडी जरी मानवता शिल्लक असेल तर तुम्ही पॅलेस्टाइनमध्ये घडणाऱ्या घटनांचं समर्थन करणार नाहित.” तसंच आणखी एका ट्विटमध्य़े तो म्हणाला, “मानवतेचा एकच देश आहे आणि ते म्हणजे संपूर्ण जग” इरफानच्या या ट्विटवर आमदार दिनेश चौधरी यांनी दिलेली प्रतिक्रिया कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

दिनेश चौधरी यांनी इरफानच्या ट्वीटवर टीका केलीय. “इरफान पठाणला दुसऱ्या देशाबद्दल इतकी आपुलकी आहे. मात्र स्वत:च्या देशातील बंगालबद्दल एक ट्विट करू शकले नाही.” असं ते या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. कंगनाने हे ट्विट शेअर करत इऱफानवर निशाणा साधला आहे.

तर क्रिकेटर इरफान पठाण याने देखील कंगनाला सडेतोड उत्तर दिलंय. एक ट्विट करत तो म्हणाला, ” माझे सर्व ट्विटस् हे मानवता किंवा देशवासियांसाठी असतात. यात अशा व्यक्तीचा दृष्टीकोन असतो ज्याने देशातील सर्वोच्च स्तराचं प्रतिनिधित्व केलंय. दुसरे कडे मला कंगना सारखी व्यक्ती भेटली जिचं अकाऊंट व्देष निर्माण केल्यानं सस्पेंड करण्यात आलंय. शिवाय व्देष पसरवणारे काही इतर अकाऊंट. ज्याचं मला ऐकावं लागतं” असं इरफान म्हणाला.

काही दिवसांपूर्वीच वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत ट्विटरने कंगनाचं अकाऊंट कायमच बंद केलं आहे. प्रत्यक्षात एखाद्याला दुखापत करण्यासंदर्भातील वक्तव्य करणं, द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा वापरुन टीका करणं हे ट्विटरच्या पॉलिसीनुसार चुकीचं आहे. अशाच काही नियमांचे कंगनाने उल्लंघन केल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.