एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे.

‘ मन- मौजी ‘ या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे जयललिला यांचा चेहरा पहिल्यांदा बॉलीवूड चित्रपटामध्ये झळकला. किशोर कुमार आणि साधना यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात त्यांनी तीन मिनिटांची छोटीशी भूमिका साकारली होती. यात त्यांनी कृष्णाच्या वेशात एक नृत्यही केले होते. त्यानंतर त्यांनी १९६८ साली ‘इज्जत’ चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत काम केले. या चित्रपटात धर्मेंद्र आणि तनुजा यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘आ जा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार’ हे ‘चोरी-चोरी’ चित्रपटातील त्यांचे आवडते गाणे होते.

‘इज्जत’ चित्रपटातील सहा गाणी

आपल्या प्रवेशाने लाखो लोकांना हरखून टाकण्याची आणि जाण्याने तेवढ्याच लोकांना चटका लावण्याची क्षमता जयललितांमध्ये नक्कीच होती. त्यांचा जन्म अयंगार ब्राह्मण परिवारातला. म्हैसूरच्या महाराजांच्या डॉक्टरांची त्या नात होत्या. कोमलवल्ली हे त्यांचे मूळ नाव. आजोबांच्या मृत्यूनंतर आई संध्या (मूळ नाव वेदवल्ली) आणि कोमलवल्ली चेन्नईला आल्या. संध्या चित्रपटांत छोटी-मोठी कामे करून चरितार्थ चालवत असे. जयललितांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आणि लगेच त्यांचा चित्रपटांत प्रवेश झाला. ‘चिन्नद गोंबे’ या कन्नड चित्रपटांतून जयललितांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. ‘वेन्निरा आडै’ (विधवेची वस्त्रे) हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट. एमजीआर नामक नटवराच्या पारखी नजरेने या नव्या तारकेतील चमक हेरली आणि त्यांना ‘आयिरत्तिल ओरुवन’ या चित्रपटात संधी मिळाली. त्यानंतर दोघांची जोडी जमली आणि रसिकांनी दोघांनाही डोक्यावर घेतले. जयललितांनी काम केलेल्या सुमारे ११५ चित्रपटांतील २८ चित्रपट या दोघांच्या जोडीचे आहेत. त्या चित्रपटाच्या यशामुळे एमजीआर आणि जयललितांमधील जवळीक वाढली. अभिनेत्री म्हणून जयललितांची कारकीर्द फारशी उठावदार नव्हतीच. १९९२ साली आलेला ‘निंग नल्ला इरुक्कनुम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.

६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबररोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना जयललिता यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र रविवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर अपोलो रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ज्ञ आणि अन्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. जयललिता यांच्या निधनानंतर संपूर्ण तामिळनाडूमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.