बॉलिवूडचा सूपरस्टार शाहरूख खानला क्रिकेट किती आवडतो हे सर्वांनाच माहित आहे. क्रिकेटविषयी याच प्रेमामुळे शाहरूखने आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाचा मिनी ट्रेलर भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान प्रदर्शित केला. ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाप्रमाणेच याही चित्रपटाचे ३०-३० सेकंदांचे मिनी ट्रेलर प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकीच एक या सामन्यादरम्यान प्रदर्शित झाला.

चित्रपटात शाहरूख निभावत असलेल्या हॅरीची भूमिका प्रेक्षकांना पाहताक्षणी पसंत पडेल असं म्हणायला हरकत नाही. हॅरीच्या चंचल आणि मैत्रिपूर्ण स्वभावाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूस सेजलची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काचा निरागसपणा यामध्ये पाहायला मिळतोय. गुजराती मुलीची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काची गुजराती लोकांप्रमाणेच बोलण्याची पद्धत आणि शब्दांचे उच्चार विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिकांबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

शाहरूखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरदेखील हा मिनी ट्रेलर चाहत्यांसाठी शेअर केलाय. ‘कॅरेक्टर खराब’ असं नाव त्याने या मिनी ट्रेलरला दिलंय. ‘सेजल, मी तुला आधीच सांगतिलं होतं की मी थोडा हलक्या विचारांचा आहे. आता उद्या आणखी काही सांगेन,’ असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

वाचा : ऐश्वर्याला ‘कोल्हीण’ का म्हणाली कतरिना ?

दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाबरोबरच शाहरुखने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे हिंदी भाषेतून समालोचन केलं. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान आकाश चोप्रासह तमाम क्रिकेट चाहत्यांचं त्याने मनोरंजन केलं.

वाचा : ‘त्या’ रेल्वे प्रवासामुळे शाहरूख पुन्हा एकदा अडचणीत

‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून अनुष्का आणि शाहरूख तिसऱ्यांदा एकत्र येताहेत. त्यात इम्तियाजबरोबर या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.