सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या ‘अ जेंटलमन’ चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालंय. ‘चंद्रलेखा’ असं या गाण्याचं शीर्षक असून हे एक पार्टी साँग आहे. याआधी प्रदर्शित झालेला ‘डिस्को’सुद्धा पार्टी साँग होतं. या चित्रपटात पहिल्यांदा सिद्धार्थ दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थची पहिली भूमिका सुशील गौरवची आहे तर दुसरी भूमिका रिस्की ऋषीची आहे. ‘चंद्रलेखा’ गाण्यात सिद्धार्थ आणि जॅकलिनचा अफलातून डान्स पाहायला मिळतोय.

गाण्यात जॅकलिनचा पोल डान्स थक्क करणारा आहे. पोल डान्सचे प्रशिक्षण घेतानाचे काही फोटो जॅकलिनने सोशल मीडियावर याआधी पोस्ट केले होते. जॅकलिनच्या तोडीला सिद्धार्थचं फूट डान्सिंग यातून दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे हे ऑफीस पार्टीमधलं गाणं आहे. ऑफिस पार्टीमधील सिद्धार्थ आणि जॅकलिनचा असा अंदाज पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. दोघांची सिझलिंग केमिस्ट्रीही या गाण्याचं वैशिष्ट्य ठरतं.

वाचा : सलमानच्या त्या ‘अनकम्फर्टेबल’ गळाभेटीवर सनाचं सडेतोड उत्तर

विशाल दादलानी आणि जोनिता गांधी यांनी हे गाणं गायलं आहे. याआधी ‘बात बन जाये’ गाण्यात मियामी येथील नयनरम्य स्थळं दाखवण्यात आली होती. या गाण्यात जॅकलिन स्केटिंग करता करता मियामीच्या बीचवर फार मस्ती करत दिसली. चित्रपटातील स्केटिंग आणि पोल डान्सच्या दृश्यांसाठी जॅकलिनने फार मेहनत घेतलीये. राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. २५ ऑगस्ट रोजी जॅकलिन आणि सिद्धार्थचा ‘अ जेंटलमन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.