अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेने इतिहास रचला. केवळ महाराष्ट्राच नाही तर देशभरात आणि जगातही जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचा भक्तगण आहे तिथे तिथे ही मालिका पोहोचली. आता ही मालिका थायलंडमध्येही प्रसारित होणार त्याचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

मल्हार देवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागेनं सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर केला आहे. थायलंडमधील ‘Zee Nung’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘हे अत्यंत अभिमानाचे क्षण आहेत,’ असं देवदत्तनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.

या मालिकेतून जेजुरी गडाधीश खंडेरायांच्या महात्माची महती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. खंडेराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आपल्या अचाट पराक्रमांनी आणि कर्तृत्वाने रयतेचं रक्षण करणारा राजा अशी या खंडोबाची ओळख. खंडेरायांच्या चरित्रामधून आणि विविध आख्यायिकांमधून त्याच्या या पराक्रमांची माहिती वाचायला आणि ऐकायला मिळते.