शब्दांचा प्रभावी वापर करत श्रोत्यांच्या मनावर आपली छाप उमटवणारे, त्यांनी लिहिलेल्या कवितेतील अर्थ मनाला भेदणारे असे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील त्यांनी लिहिलेल्या गाण्यासंदर्भातील एक भन्नाट किस्सा जाणून घेऊयात. हा किस्सा स्वत: शाहरुख खानने त्याच्या ‘टेड टॉक्स इंडिया : नयी सोच’ या कार्यक्रमात सांगितला.

जावेद अख्तर यांना चित्रपटाचे शीर्षक ‘कुछ कुछ होता है’ हे मुळात आवडले नव्हते आणि जेव्हा शीर्षकगीत लिहायचे होते, तेव्हा शाहरुख पण त्यांना त्यासाठी थोडीफार मदत करत होता. तो प्रसंग सांगताना शाहरुख म्हणाला की, ‘मी जेव्हापासून मुंबईत आलो, तेव्हापासून जावेद यांना ओळखतो. जवळपास २५ वर्षांची ही ओळख आहे. त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी काम करताना ते आमच्यावर खूप नाराज झाले होते. त्याच नाराजीत ते सहज म्हणून गेले की, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूं हाए कुछ कुछ होता है? नंतर हेच गाणं खूप गाजलं. त्यामुळे त्यांनी रागात म्हटलेले शब्दसुद्धा बरेच गाजतात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे.’

जावेद अख्तर यांनी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी काम करण्यास नकार दिला होता. पण इतका सुपरहिट चित्रपट सोडल्याचे दु:ख नंतर मला खूप झाले असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील चित्रपटासाठी गाणी लिहिणार असल्याचे त्यांनी शाहरुखला सांगितले आणि हा चित्रपट होता, ‘कल हो ना हो’. या चित्रपटातील एका गाण्यात ‘कुछ कुछ होता है’मधील ‘कुछ, कुछ’ हे दोन शब्द मी नक्कीच वापरेन, असेही त्यांनी म्हटले. म्हटल्याप्रमाणे ते दोन शब्द वापरून त्यांनी ‘कुछ तो हुआ है, कुछ हो गया है’ हे गाणे लिहिले.