अभिनेत्री जया बच्चन यांचा सार्वजनिक ठिकाणी अनेकदा पारा चढल्याचं पाहायला मिळालं. इशा देओलच्या बेबी शॉवर कार्यक्रमातदेखील त्यांनी सेल्फी घेणाऱ्या पंडितला फटकारलं होतं. नुकत्याच त्या गणपती दर्शनाला गेल्या असता, सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावरही त्यांचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
जया बच्चन गणपती दर्शनासाठी गेल्या होत्या. नेहमीप्रमाणेच त्यांच्या अवतीभोवती यावेळी चाहत्यांचा गराडा होता. अनेकजण त्यांचा फोटो काढण्याचाही प्रयत्न करत होते. दर्शन घेतल्यानंतर त्या परतण्यासाठी जेव्हा गाडीजवळ आल्या. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका चाहत्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच जया यांचा राग अनावर झाला. ‘फोटो काढू नकोस,’ असं त्यांनी चाहत्याला बजावत त्याला मूर्ख असेही म्हटले. जया यांना सेल्फी हा प्रकार अजिबात रुचत नसल्याचं या घटनेवरून स्पष्ट होतंय.
गेल्या आठवड्यात अभिनेत्री इशा देओलच्या बेबी शॉवरवेळी त्या उपस्थित होत्या. यावेळी पूजाविधीसाठी आलेल्या पंडितांनाही त्यांनी फटकारलं होतं. कार्यक्रमात एक पंडित सेल्फी घेत असल्याचं त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी, ‘तुम्ही पूजेत लक्ष द्या,’ असं त्यांना सांगितलं. हे ऐकताच तेथे उपस्थित असलेले लोक हसू लागले.
वाचा : माहेरचा गणपती : उत्सवाच्या अतिरेकापेक्षा मनोभावे पूजा महत्त्वाची- अनुराधा राजाध्यक्ष
गेल्या वर्षी मुंबईतील एका महाविद्यालयात त्या प्रमुख पाहुणे म्हणून गेल्या होत्या. तेथे फोटो काढणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी बजावलं. ‘फोटो काढणं बंद करा. भारतीयांना काही सामान्य शिष्टाचार शिकण्याची गरज आहे. तुमच्याकडे कॅमेरा आणि मोबाइल असल्यावर कोणाचाही, कोणत्याही क्षणी फोटो काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो. हे खूपच त्रासदायक आहे. माझा फोटो काढण्यापासून रोखण्याचं स्वातंत्र्य मला आहे. या सामान्य गोष्टी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थांना आणि घरी पालकांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत,’ असं त्या म्हणाल्या.