बॉलिवूडचे नावाजलेले कॉमेडियन जॉनी लिवर यांची मुलगी जेमी सध्या ‘सबसे बडा कलाकार’ या टिव्ही शोमधून खळखळून हसवून सगळ्यांची मनं जिंकत आहे. १० डिसेंबर १९८७ मध्ये मुंबईत जन्मलेल्या जेमीचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईमध्येच झाले. पण नंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली आणि तिथे वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग कम्युनिकेशमध्ये मास्टर्सची डिग्री मिळवली. सध्या जॉनी लिवर हे कमी सिनेमांमध्ये दिसतात. पण जॉनीची ही उणीव त्यांची मुलगी भरून काढतेय. तुम्हाला माहितीये का स्वतः जॉनी यांनाही जेमीने कॉमेडीमध्ये करिअर न करता एखादी नोकरी करावी असंच वाटायचं.

एका मुलाखतीत जेमीने सांगितले की, ‘ती बाबांना फार घाबरायची. ते जेव्हाही घरी यायचे तेव्हा घरात पूर्ण शांतता असायची. मी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं असंच त्यांना वाटायचं. म्हणूनच शालेय शिक्षणानंतर त्यांनी मला लंडनला पुढील शिक्षणासाठी पाठवले. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथल्याच एका कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम ही केले. लोकांना फोन करून त्यांची वेळ घेण्यासाठी विनंती करणं हे अजिबातच पसंत नव्हतं. अनेकदा मी रडायचेही. माझी आवड रंगभूमी आणि अभिनय हीच होती. लंडनमध्ये तर कोणाला माहितही नव्हते की मी जॉनी लिवरची मुलगी आहे.’

https://www.instagram.com/p/BJPukPKhXZg/

२०१२ पर्यंत मी मनावर दगड ठेवून नोकरी केली. एक दिवस बाबा कोणत्यातरी कार्यक्रमासाठी लंडनला आले होते. तेव्हा पूर्ण हिंमत एकवटून मी त्यांना सांगितलं की, मला अभिनय आणि कॉमेडी करायची आहे. माझं हे बोलणं ऐकून पहिल्यांदा तर त्यांना आश्चर्यच वाटलं. पण नंतर ते म्हणाले की, ‘ठिक आहे पण तुला हे सिद्ध करून दाखवावं लागेल की, तू हे करू शकतेस. हे कमी होतं की काय त्यांनी मला पुढच्या १० मिनिटांत अभिनयाची झलक दाखवायलाही सांगितली. त्यांनीच माझे ऑडिशन घेतले. त्यानंतर मी लंडनमध्ये काही परफॉर्मन्सही केले. तिथे लोकांना माझे काम इतक आवडले की संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांच्याच आवाज घुमत होता. सुरूवातीला मी सिनेसृष्टीत यावं अशी बाबांची मुळीच इच्छा नव्हती. पण नंतर जेव्हा त्यांनी माझ्यातले सुप्त गुण दिसले त्यानंतर त्यांनी कधीच विरोध केला नाही.