आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या जॉनी लिव्हर यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. जॉनी प्रकाश असं त्यांच खरं नाव. पण, प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली ती म्हणजे जॉनी लिव्हर याच नावाने. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून नावाजलेल्या या कलाकाराने आतापर्यंत ३०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. सध्या ते ‘पार्टनर्स – ट्रबल हो गई डबल’ या कॉमेडी सीरिजमध्ये काम करत आहेत. लाखो लोकांना आपल्या विनोदांनी हसवणाऱ्या या अवलियाच्या आयुष्यातही काही दुःखाचे क्षण आले. या क्षणांना ते सामोरेही गेले. पण, त्यांना एका गोष्टीची आजही खंत वाटते.

Sagarika-Zaheer’s Wedding Reception : झहीर-सागरिकाचे ‘वेडिंग रिसेप्शन’

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जॉनी यांनी आपल्या मनातील दुःख सांगितले. तुमच्या आयुष्यातील चांगला आणि वाईट क्षण कोणता असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. त्यावर जॉनी म्हणाले की, माझ्या आयुष्यात खूप सारे चांगले क्षण आले. मुलगी जेमीला परफॉर्म करताना पाहतो तेव्हा मला प्रचंड आनंद होतो. अजूनही काही जुन्या गोष्टी आठवल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलते. पण, माझ्या आयुष्यात एक वाईट क्षणही आला आणि आता तो बदलताही येणार नाही. माझ्या बहिणीवर माझे खूप प्रेम होते. माझ्या बहिणीचे निधन झाले, तेव्हा मी तिचे अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. घरात पैशांची कमतरता असल्यामुळे मला त्यावेळी स्टेज शो करण्यासाठी जावे लागले होते. शेवटच्या क्षणी मी तिचा निरोप घेऊ शकलो नाही याचे मला आजही दुःख वाटते.

PHOTOS : आमिर-किरणने थीम पार्कमध्ये साजरा केला आझादचा वाढदिवस

जॉनी यांनी लहान असताना बऱ्याच हालअपेष्टा सहन केल्या. ‘लोकसत्ता’मध्ये एकदा त्यांचा लेख आला होता. त्यात त्यांनी लिहिलेलं की, ‘फीचे पैसे नसल्याने मला अपमानास्पदरित्या शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी काहीही केलं. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेन, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे. मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेने माझा सत्कार केला विचारलं, ‘आम्ही तुझ्यासाठी काय करू.’ मी म्हणालो, ‘फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या. मी त्यांची फी भरेन.’ सर म्हणाले, ‘आम्ही यापुढे असे होऊ देणार नाही.’ हे ऐकून मला खूप समाधान वाटलं.’