२०१७ मध्ये हार्वे वेन्स्टिनची गाजलेली प्रकरणं, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला हॅकर्सचा बसलेला फटका, ‘वुल्वरिन’चा गोंधळ आणि ‘कोको’सारख्या अ‍ॅनिमेशनपटांनी मिळवलेले अनपेक्षित यश यांसारख्या अनेक लहान-मोठय़ा घडामोडी हॉलीवूडमध्ये घडल्या. मात्र या सगळ्या घटनांच्या भाऊगर्दीत डीसीचा ‘जस्टिस लीग’ हा सुपरहिरोपट मोठे आकर्षण ठरला आहे.

‘डीसी’ने खरं म्हणजे २०१६ पासूनच अगदी नियोजित पद्धतीने ‘सुसाइड स्क्वॉड’, ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन’, ‘वंडर वुमन’ असे आपले एकेक चित्रपट प्रदर्शित करत ‘जस्टिस लीग’साठी पोषक वातावरण तयार केले. त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड कुतूहल होते. परंतु हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत माव्‍‌र्हलने ‘थॉर रॅग्नारॉक’, ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ आणि ‘लोगन’ हे तीन दमदार चित्रपट देऊन प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वळवून घेतले. दरम्यान, ‘डंक र्क’, ‘कोको’, ‘अ‍ॅनाबेला क्रिएशन’ यांसारखेही काही उत्तम चित्रपट आले ज्यांनी चाहत्यांचे मन जिंकले. परिणामी ‘जस्टिस लीग’ची हवा कमी झाली. चाहत्यांनी या सुपरहिरोपटाला अक्षरश: पाठ दाखवल्यामुळे या वर्षीचा सर्वात फ्लॉप बिग बजेट चित्रपट अशी त्याची नोंद झाली.

तिकीट बारीवर केवळ ६४६.७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स कमावणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ६०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च केला गेला होता. ‘डीसी’ने आजवर तयार केलेल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत या सुपरहिरोपटावर दुप्पट खर्च केला होता. ‘माव्‍‌र्हल’ला मात देण्याच्या अपेक्षेने केलेल्या या चित्रपटासाठी १५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे नुकसान आणि ‘डीसी’च्या कारकीर्दीतील आजवरचा सर्वात सुपरफ्लॉप चित्रपट असं अपयशच त्यांच्या पदरी पडलं. पटकथेत असलेल्या त्रुटी किंवा ठोकळेबाज दिग्दर्शन अशी विविध कारणं या अपयशामागे असल्याचा सूर चित्रपट अभ्यासकांनी लावला आहे. ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ ही संकल्पना पुढे नेण्याच्या दृष्टीने हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता मात्र अपयशामुळे ‘डीसी’ अनुषंगाने विचार करता हा त्यांच्या  आणखी काही पावलं मागे पडले असून ‘माव्‍‌र्हल’ मात्र आपल्याच वेगात पुढे गेले आहे.