‘कबाली’चा पहिला लूक प्रसिध्द झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तसेच चित्रपटाविषयी सिनेरसिकांमध्ये जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत होती. चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ही उत्सुकता सर्वत्र अनुभवता येत होती. आता चित्रपट प्रदर्शित झाला असून, चित्रपटातील सुपरस्टारच्या प्रत्येक लूकचा चाहते अनुभव घेऊ शकतात. एकाच चित्रपटात रजनीकांत यांचे तीन लूक कसे असतील, याविषयी थलाइवाचे चाहते अद्याप कल्पनाच करत होते. असे असले तरी पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून रजनीकांत यांच्या या लूकची छोटीशी झलक पाहायला मिळत होती म्हणा. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रंजीत म्हणाले की, या चित्रपटात रजनीकांत यांना तीन लूकमध्ये दर्शविण्यात आले आहे. त्यांचा ३० वर्षीय तरुण अवतार हा ‘साईड पार्टिशन’ केशरचना आणि भरगच्च मिशा असलेला असा आहे. अन्य दोन लूक हे वृद्धापकाळातील असून एका लूकमध्ये त्यांना दाढीमध्ये दर्शविण्यात आले आहे, तर अन्य लूकमध्ये दाढी नाहिये. युवकाच्या लूकमधील रजनीकांत तरुण आणि तंदुरुस्त दिसण्यासाठी बॉडी सूटचा वापर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
वृद्ध पुरुषाच्या लूकमधील दाढीवाल्या लूकला घेऊन रजनीकांत साशंक होते. परंतु, पहिल्या लूकला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढल्याची माहिती रंजीत यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मलेशियातील चित्रीकरणादरम्यान रजनीकांत यांच्या चाहत्यांना आवरणे ही फार मोठी समस्या होती. मलेशियात त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. सेटवर एवढी गर्दी असे की दुसरा टेक घेणे देखील कठीण होऊन बसे. रजनीकांत यांच्या चित्रपटाचे ‘डाय-हार्ड फॅन्स’ आपापल्यापरीने चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत. चेन्नई आणि बेंगलुरूमधील कार्यालयांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सुटी जाहीर केली आहे. सुपरस्टारप्रतीचे प्रेम आणि सन्मान दर्शविण्यासाठी रक्तदानदेखील करू अशी प्रतिज्ञा रजनीकांत यांच्या चाहत्यांनी केली आहे.