ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं आहे. आपल्या दमदार अभिनय आणि संवाद लेखनाने अनेक चित्रपट गाजवणाऱ्या कादर खान यांना लहानपणी खूप संघर्ष करावा लागला. अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये जन्म झालेल्या कादर खान यांचं कुटुंब भारतात येऊन स्थायिक झालं होतं. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांना अत्यंत हालाखीत दिवस काढावे लागले. मुंबईतील झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. घटस्फोटानंतर त्यांच्या आईची इच्छा नसतानाही दुसरं लग्न लावून देण्यात आलं. सावत्र वडील कादर खान यांना खूप त्रास द्यायचे.

कादर खान यांचे सावत्र वडील त्यांना वडिलांकडे पैसे मागण्यासाठी पाठवत असतं. तुझ्या वडिलांकडे जाऊन खर्चासाठी दोन रुपये घेऊन ये असं ते सांगत असत. कादर खान यांना आपल्या वडिलांकडे जाऊन दोन रुपयांसाठी अक्षरक्ष: भीक मागावी लागत असे. त्यांच्या वडिलांचीही एवढी परिस्थिती नव्हती, पण ते कुठून तरी पैसे मिळवून देत असत. या दोन रुपयांत घरातील सामान भरलं जायचं. परिस्थिती इतकी वाईट होती की, त्यांना आठवड्यातून तीन दिवस जेवण मिळायचं आणि तीन दिवस भुकेल्या पोटी झोपी जावं लागत असे. अशा संघर्षात कादर खान यांचं बालपण गेलं.

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

आईवर उपचार करण्यासाठी डॉक्टरला खांद्यावर उचलून घेऊन आले होते कादर खान 

कादर खान यांनी एका मुलाखतीत आपल्या आईच्या निधनाबद्दल सांगितलं होतं. कादर खान एका स्पर्धेसाठी बाहेर गेले होते. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं तर आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एका भांड्यात ती उलटी करुन ते सगळं रक्त बाथरुममध्ये ओतून देत होती. हे चित्र पाहून कादर खान प्रचंड घाबरले. त्यांनी आईला विचारलं असता तिने थोडासा त्रास होत असल्याचं सांगितलं. यावर कादर खान तू मला हे आधी का सांगितलं नाहीस विचारत चिडले आणि डॉक्टरला आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण डॉक्टर त्यांच्यासोबत येण्सास तयार होत नव्हता. यावेळी त्यांनी चित्रपटातील एखाद्या सीनप्रमाणे डॉक्टरला खांद्यावर उचलून घेतलं आणि घरी आणलं. घरी आल्यानतंर डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांचा आईचा मृत्यू झाला होता.

…या प्रसंगामुळे कादर खान झाले विनोदी अभिनेता

कादर खान यांनी 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं.  300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं. त्यांची लेखणी आणि अभिनय वेगळंच रसायन होतं. त्यांनी लिहिलेल्या संवादातून समाजातील भीषण वास्तव मांडण्याचा ते प्रयत्न करत असत. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणारा एक उत्तम अभिनेता म्हणून कादर खान यांना ओळखलं जायचं.

Story img Loader