सुंदर कथा, अभिनय आणि गाणी यांच्या जोरावर कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या चित्रपटाची भरभरून स्तुती केली होती. हा चित्रपट केवळ हिंदीतच गाजला नाही तर दक्षिणेकडील लोकही या चित्रपटाच्या प्रेमात पडले. तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये ‘क्वीन’चा रिमेक होत आहे. तमिळ आणि कन्नडमध्ये होत असलेल्या रिमेकची धुरा अभिनेते आणि चित्रपट निर्माते रमेश अरविंद हे सांभाळणार आहेत. कन्नडमध्ये अभिनेत्री पारूल यादव मुख्य भूमिका साकारणार आहे तर तमिळसाठी अभिनेत्री काजल अग्रवालला विचारल्याची सूत्रांची माहिती आहे.
तमिळमधील ‘क्वीन’च्या रिमेकबद्दल बोलताना रमेश अरविंद म्हणाले, ‘मी अधिकृतपणे तमिळसाठी अभिनेत्री कोण असेल हे सांगू शकत नाही मात्र या चित्रपटात काजल अग्रवाल काम करणार असे मला सांगण्यात आले आहे.’ रमेश अरविंद यांनी ‘उथमा विलन’ आणि ‘रमा शमा भामा’ यांसारखे अनेक गाजलेल्या आणि समीक्षकांकडून विशेष पसंती मिळवलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
वाचा : ‘अभी ज्यादा उडो मत…’ सलमान पत्रकारावर चिडला
रमेश अरविंद यांच्याआधी अनुभवी अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती रेवती ‘क्वीन’च्या तमिळ रिमेकचे दिग्दर्शन करणार होती. अभिनेत्री तमन्ना या चित्रपटात काम करणार होती. मात्र दोघींनीही नंतर अज्ञात कारणांमुळे या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. या अफलातून चित्रपटाच्या तमिळ रिमेकमध्ये लिसा हेडनची भूमिका अॅमी जॅक्सन साकारताना दिसणार आहे.