मुंबईमधील इस्कॉन मंदिरात ३१ ऑक्टोबरला अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वडिलांचे श्राद्ध होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या व्यक्ती मुखर्जी कुटुंबियांना भेटायला आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांच्या नजरा या राणीची चुलत बहिण काजोलवर होत्या. राणी आणि काजोलमध्ये विस्तव जात नाही हे तर साऱ्यांनाच माहित आहे.
दोघी शक्यतो एकमेकांपासून दूर राहणेच पसंत करतात. काजोलचे वडिल शोमू मुखर्जी आणि राणीचे वडील राम मुखर्जी हे सख्खे चुलत भाऊ. एकमेकांमध्ये कितीही मतभेद असले तरी दुःखाच्या प्रसंगी सर्व मतभेद विसरुन एकत्र येण्याकडे काजोलने भर दिल्याचे दिसते. त्यामुळेच राम यांच्या श्राद्धाला काजोल आणि तिची बहिण तनिशा यांनी उपस्थिती लावली होती.
आदित्य चोप्रा आणि राणीची मुलगी आदिरा यांचीही झलक यावेळी दिसली. फराह खान, अनिल कपूर, सोनम कपूर, आशुतोष गोवारिकर, अली अब्बास जफर यांनीदेखील उपस्थिती लावली होती. राम मुखर्जी यांचे २२ ऑक्टोबरला पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. त्यांना कलेचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. सिनेनिर्माते शशाधर मुखर्जी हे राम मुखर्जी यांचे काका होते.
‘फिल्मालय स्टुडिओज’शी राम मुखर्जी यांचं अगदी जवळचं नातं होतं. त्यांची पत्नी उत्तम गायिका असून मुलगी राणी मुखर्जी अभिनय क्षेत्रात चांगलीच नावारुपास आली. सिनेसृष्टीत राणीने वडिलांचा वारसा पुढे नेत आपल्या कुटुंबाच्या नावाची परंपरा सुरु ठेवली आहे. ‘तोमार रक्ते अमार सोहाग’(बंगाली), ‘एक बार मुस्करा दो’, ‘रक्ते लेखा’(बंगाली), ‘रक्त नदीर धारा’(बंगाली) हे राम मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेले काही सिनेमे आहेत.