शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तान्हाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वठवणार आहेत. मात्र चित्रपटात अभिनेत्री काजोल कोणती भूमिका साकारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटातील काजोलच्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आला आहे. खुद्द अजय देवगणने काजोलचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटवरुन काजोल चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे पाहायला मिळते.

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळाते होते.