छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम आजवर बऱ्याच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपण ऐकला आणि पाहिला आहे. हाच सुवर्णमय इतिहास आता बॉलिवूड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगण लवकरच तानाजी मालुसरे यांच्यावर साकारल्या जाणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सलमान खान यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता अजयची पत्नी- अभिनेत्री काजोलसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं समजतंय.
‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात काजोल तानाजींच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तिने नुकतीच शूटिंगला सुरुवात केली आहे. अजय- काजोलची जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत, तेसुद्धा पती- पत्नी म्हणून. तर अभिनेता सैफ अली खान यामध्ये उदयभान राठोडची भूमिका साकारणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सैफने शूटिंगला सुरुवात केली असून आता काजोलसुद्धा त्यात सहभागी झाली आहे.
Video : प्रभासचे चाहते आहात?, तर मग हा व्हिडिओ नक्की पाहा!
काही दिवसांपूर्वीच अजयने ‘तानाजी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कोणती भूमिका असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नसून अजिंक्य सध्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत.