लग्नाआधीच प्रेग्नंट असणे हे बॉलिवूड अभिनेत्रींसाठी काही नवे नाही. अनेक वेळा अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु असतात. श्रीदेवीं पासून ते नेहा धूपियापर्यंत अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात होते. आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव नोंदण्यात आले आहे. ते म्हणजे अभिनेत्री कल्कि कोचलिन.

गेल्या काही दिवसांपासून चौकटीबाहेरील भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी अभिनेत्री कल्कि कोचलिन चर्चेत आहे. अनुरागसह झालेल्या घटस्फोटानंतर कल्कि बरेच दिवस सिंगल होती. काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली. मात्र कल्कि लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द कल्किने सोशल मीडियावर फोटो शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच कल्किने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कल्कि गर्भवती असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कल्किने सोशल मीडियाद्वारे ती आई होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान कल्किने वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देण्याचा प्लॅन केला असल्याचे देखील सांगितले आहे. कल्कि आणि गायने त्यांच्या मुलाचे नाव देखील ठरवून ठेवले आहे.

कल्कि आणि अनुराग यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केले. अखेर २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनुरागच्या ‘सेक्रेड गेम्स २’ या वेब सीरिजमध्ये कल्कीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.