नेहमी बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गॉडफादरच्या विरोधात बोलणाऱ्या कंगना रणौतलाच एका अभिनेत्रीने ‘गॉडफादर’ मानले आहे. या अभिनेत्रीला कंगनामुळे बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे घराणेशाही आणि गॉडफादरच्या वादात आता स्वत: बॉलिवूड ‘क्वीन’ कंगनाच अडकताना दिसतेय.
काही महिन्यांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात गेलेल्या कंगनाने करण जोहरवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. इतकेच नाही तर घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो ‘मुव्ही माफिया’ आहे असेही तिने म्हटले होते. कंगनाच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अंकिता या चित्रपटात झलकारी बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. झलकारी नेहमीच राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत उभ्या असायच्या. त्या लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. त्यांच्यासोबत सल्ला घेऊनच अनेक गोष्टी राणी लक्ष्मीबाई करायच्या.
वाचा : ‘परमाणू’तील डायनाचा हा लूक पाहिला का?
बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना अंकिताने कंगना आपली गॉडफादर असल्याचे म्हटले आणि कंगनामुळेच पदार्पण करण्याची संधी मिळाल्याचे तिने सांगितले. अंकिताने याआधी अनेकदा बॉलिवूडमध्ये येण्याचा प्रयत्न केला मात्र तिला यश मिळाले नव्हते आणि अखेर आता कंगनाच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटातून तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कंगनाने मदत केल्याचे अंकिताने सांगितले. त्यामुळे घराणेशाही आणि गॉडफादरच्या विरोधात बोलणारी कंगना आता अंकिताच्या या वक्तव्यानंतर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.