मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आरेतील जंगल व मेट्रो कारशेड संदर्भात मोठी घोषणा केली. “मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे,” अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर अभिनेत्री कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली. काही मोजक्या श्रीमंत लोकांसाठी शहराचा विकास थांबवणं हा या समस्येवर उपाय नव्हता, असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा मौनी रॉयचं हॉट फोटोशूट

“काही फॅन्सी कार्यकर्त्यांची समस्या ही सर्व मुंबईकरांची समस्या असू शकत नाही. गेल्या वर्षभरात मी देखील एक लाखांपेक्षा अधिक रोपं लावली आहेत. झाडांना तोडणं अयोग्यच आहे पण काही मोजक्या श्रीमंत लोकांसाठी शहराचा विकास थांबवणे हे देखील योग्य नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगना रणौतने महाराष्ट्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “अतिरिक्त खर्च किती असेल?”; मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो कारशेड घोषणेवर सुमित राघवनचा सवाल

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,”मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग येथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही. या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मेट्रो कर्मचाऱ्यांचे आभार मानतो,” असं मुख्यमंत्री म्हणाले.