पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिनं भारतीय वायूदलाचं कौतुक केलं आहे. भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला. या कारवाईनंतर समस्त बॉलिवूडकडून वायूदलाचं कौतुक होत आहे. अभिनेत्री कंगनानंही वायूदलाचं कौतुक केलं आहे.

भारतीय वायूदलाला मी सलाम करते ते खरे हिरो आहेत, असं म्हणत कंगनानं कौतुक केलं आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलणाऱ्या पंतप्रधान मोदींचेही कंगनानं आभार मानले आहेत. दहशतवाद्यांविरोधात आपला लढा आता सुरू झाला आहे. जो भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं त्याचे डोळे फोडू हे आता स्पष्ट आहे, अशा शब्दांत कंगानानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती.

काही दिवसांपूर्वी नॅशनल रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जम्मू कश्मीरला दिलेल्या विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती. ‘भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली आहे त्यामुळे आपण कोणत्या बाजूनं आहोत याबद्दल कोणत्याही राज्याच्या मनात इतका संभ्रम निर्माण व्हायला नको’ असं कंगनानं मुलाखतीत म्हटलं होतं. त्याचबरोबर पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये घातलेल्या बंदीचंही तिनं समर्थन केलं होतं.

कंगनाबरोबरच अभिनेत्री स्वरा भास्कर, सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार यांनी वायूदलाचं कौतुक केलं आहे.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. यात २०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं म्हटलं जात आहे.