बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. समाजात घडणारी कोणतीही घटना तिला खटकल्यास त्यावर ती बेधडक आणि तितक्याच निर्भीडपणे व्यक्त होत असते. त्यामुळे अनेकदा तिची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. सध्या कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. कंगना कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्हे तर तिच्या भावूक पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अलिकडेच कंगनाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराची आठवण शेअर केला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी तिच्याकडे योग्य कपडेदेखील नसल्याचं तिने म्हटलं आहे.

“पहिला राष्ट्रीय पुरस्कार. या पुरस्कार सोहळ्याशी जोडलेल्या अनेक आठवणी आहेत. कमी वयात हा पुरस्कार मिळणारी अभिनेत्रींपैकी मी एक होते. एका स्त्री केंद्रित चित्रपटासाठी महिला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं ही फार मोठी गोष्टी आहे. हा ड्रेस मी स्वत: डिझाइन केला आहे. त्यावेळी एक नवीन ड्रेस घेण्याइतपत पैसेदेखील माझ्याकडे नव्हते. हा ड्रेस खरंच इतका वाईट दिसत नाहीये ना, हो ना?,” असं म्हणत कंगनाने ही पोस्ट शेअर केली आहे.

 वाचा : करोनाचा फटका; ‘द कपिल शर्मा’ शो लवकरच होणार बंद?

‘फॅशन’ या चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळी तत्काली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्याला कंगनाने अनारकली ड्रेस परिधान केला होता.

पाहा : सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

 दरम्यान, २००८ साली प्रदर्शित झालेल्या फॅशन चित्रपटात कंगनाने सोनाली गुजराल ही भूमिका साकारली होती. फॅशन जगतावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मधूर भंडारकर यांनी केलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, प्रियांकासोबतच कंगनाचा अभिनयदेखील तितकाच लोकप्रिय ठरला.