अभिनेत्री कंगना रणौत आणि सोशल मीडिया वॉर हे काही आता नवं राहिलं नाही. कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून बॉलिवूडसह देशा विदेशातील घडामोडींवर कंगना परखडपणे तिचं मत मांडत असते. यामुळे कंगनाला अनेकदा ट्रोल व्हावं लागतं. तर ट्रोलर्सना उत्तर द्यायला कंगना मागे हटत नाही. कंगनाचं आणखी एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. यावेळी कंगनाने थेट अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

भारतातील करोनाच्या स्थितीबद्दल अमेरिकेत चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. अमेरिकेत जुन्या घडमोडींचे फोटो पसरवून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हणत तिने संताप व्यक्त केलाय.

कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणालीय, ” ११ महिन्य़ांपूर्वीच्या गॅस लीकचे फोटो आणि मृतदेहांच्या फोटोचा गैरवापर करून महामारीच्या या काळात लोकांच्या मनात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या अमेरिकेची लाज वाटतेय आणि तसंही स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेचे काय विचार आहेत? लक्षात ठेवा तुम्ही ट्रम्प यांच्याबाबतीत काय केलं ते आणि तुम्ही तुमची लोकशाही चीनला विकली ते ?, गप्प बसा आता, उपदेश देऊ नका.” असं म्हणत कंगनाने थेट अमेरिका आणि अमेरिकेतील मीडियावर निशाणा साधला आहे.

वाचा: “मोदींना नेतृत्व करता येत नाही….मोदीजी कृपया राजीनामा द्या”; कंगना रणौतचं ट्विट चर्चेत

कंगनाचं हे ट्विट सध्या चर्तेत असून अनेकांनी कंगनाच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे. नुकतच कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या नेटकऱ्यांवर निशाणा साधला होता. एक ट्विट करत “मोंदीना नेतृत्व करता येत नाही.. मात्र या ट्रोल करणाऱ्यांना सर्व काही येतं” अशा आशयाचं ट्विट तिने केलं होतं. मात्र या ट्विटमुळे कंगना पुन्हा ट्रोल झाली होती.