दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाला माझा पाठिंबा आहे, पण शबाना आझमींच्या राजकारणाला नाही अशी अप्रत्यक्ष टीका अभिनेत्री कंगना रणौतने केली आहे. आझमींच्या डाव्या विरुद्ध उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे मी सावध भूमिका घेत आहे, असेही तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ‘पद्मावती’च्या वादाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाच्या सुरक्षेसाठीच्या याचिकेत स्वाक्षरी करण्यास कंगनाने नकार दिला होता. चित्रपटाला राजपूत संघटनांचा देशभरातून तीव्र विरोध होत असून दीपिका आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. याविरोधात शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ ही मोहिम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दीपिकाच्या सुरक्षेसाठी बॉलिवूड कलाकारांच्या याचिकेवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
‘याचिकेत स्वाक्षरी करण्यासाठी मला अनुष्का शर्माचा फोन आला. त्यावेळी मी शूटिंगमध्ये व्यग्र होती. मी पूर्णपणे दीपिकाच्या पाठीशी आहे पण यामागे असलेल्या शबाना आझमींच्या राजकारणामुळे मला सावधपणे भूमिका घ्यावी लागेल. देशातील सध्याच्या परिस्थितीवर माझे स्वत:चे वेगळे विचार आणि मते आहेत. जेव्हा माझ्यावर अन्याय झालेला, काही प्रभावशाली पुरुषांकडून मला विरोध झालेला, तेव्हा मोहिम सुरू करणारे कुठे होते?,’ असा सवाल कंगनाने केला.
वाचा : दिशा- टायगरच्या रिलेशनशिपमुळे ‘बागी २’चे निर्माते पेचात?
हेमा मालिनी, जया बच्चन, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विद्या बालन, अनुष्का शर्मा, प्रियांचा चोप्रा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अभिनेत्रींनी आझमींच्या मोहिमेत सहभाग घेतला. ती याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आली आहे.