कन्नड चित्रपट ‘लव्ह यू राचू’ या चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅन विवेकचा मृत्यू झाला आहे. तो २८ वर्षांचा होता. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले असून पोलिसांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली आहे. ‘लव्ह यू राचू’ या चित्रपटाचे कर्नाटकमधील बिडदी येथे चित्रीकरण सुरु होते. स्टंट करत असताना विवेकला एका धातूच्या तारेने बांधले होते. स्टंटमॅन विवेक एका हायव्होल्टेज वायरजवळ असणाऱ्या क्रेनवर उभा होता. यावेळी धातूच्या तारेसोबत संपर्क आल्याने त्याला विजेचा झटका बसला आणि जागीच मृत्यू झाला. दरम्यान स्टंट करत असलेल्या दुसऱ्या स्टंटमॅनला देखील वीजेचा झटका बसला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर आणि निर्माते गुरु देशपाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. तसेच चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

‘लव्ह यू राचू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता कृष्णा अजय रावने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य केले. ‘गेल्या काही दिवसांपासून आम्ही चित्रीकरण करत होतो. नेमकं काय झालं हे मला माहिती नाही. कारण मी चित्रीकरण सुरु असलेल्या ठिकाणापासून थोडं लांब होतो. मी काय झाले हे पाहिले नाही. मला जोरात आवाज ऐकू आला त्यानंतर नेमकं काय झालं हे कळालं’ असे कृष्णा म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘स्टंट दिग्दर्शकांना त्यांच्या कामाच्या बाबतील काही बोललेले आवडत नाही. त्यामुळे त्यांना कुणी सल्ला देत नाही. मी सुरुवातील सेटवर लोकांना विचारले होते की धातूच्या तारेचा वापर करणे योग्य आहे का?’