कपिल शर्माचे मानसिक आरोग्य ठीक नाही. तो कधीही आत्महत्या करु शकतो असे कपिलचे पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड प्रीती सिमोईसने प्रसारमाध्यमांना सांगितले. कपिलने प्रीती तिची बहिण निती आणि एका एण्टरटेनमेन्ट विरोधात तक्रार दाखल केली आहे. कपिलने प्रीती आणि नितीविरोधात अनेक ट्विटही केले. कपिलच्या ट्विटनंतरच प्रीतीचे हे धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे.

कपिलने नाही तर त्याच्या प्रेयसीने केले सारे ट्विट-
बॉलिवूड भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रीती म्हणाली की, कपिल फार समजुतदार आहे. कदाचित त्याच्या फोनमधून त्याची प्रेयसी गिन्नी छत्रथ ट्विट करत असेल असा अंदाज व्यक्त केला. प्रीती म्हणाली की, ‘मला नाही वाटतं की कपिल असं काही करेल. त्याची प्रेयसी गिन्नी किंवा इतर कोणी तरी त्याचा फोन घेऊन असे करु शकतं. जर गिन्नीने असे काही केले असेल तर मात्र मला कपिलच्या निवडीबाबत मला कीव येते.’ प्रीतीला कपिलकडून कोणतीही कायदेशीर नोटीस आली नसल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.

कपिलच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार-
प्रीती पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून कपिलची तब्येत बिघडतच चालली आहे. त्याच्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार येतात. यावेळी प्रीतीने ही चिंताही व्यक्त केली की, तो फक्त नैराश्यग्रस्त नसून त्याला बायपोलर किंवा सिजोफ्रेनियासारखा आजारही आहे. प्रीतीच्या मते, ती जेव्हा त्याची मॅनेजर होती तेव्हा फक्त ती त्याचा शोच सांभाळत नव्हती तर त्याचं आयुष्यही सांभाळत होती.

गिन्नीच्या सांगण्यावरुन वेगळा झाला कपिल-
प्रीतीच्या सांगण्यानुसार, प्रीती आणि कपिलने एकत्र काम करावे असे गिन्नीला वाटत नव्हते. प्रीती म्हणाली की, ‘काही दिवसांपूर्वी कपिल कामासंदर्भात बोलण्यासाठी माझ्या घरी आला होता. पण घरी गेल्यानंतर त्याने मला मेसेज करुन सांगितले की, गिन्नीला आम्ही दोघांनी एकत्र काम करणे पसंत नाही. माझ्या मनात कपिलसाठी काहीही कटुता नाही. फक्त मला त्याची फार काळजी वाटते. मी त्याच्यावर प्रेम केलं आहे, त्यामुळे मी त्याला या अवस्थेत पाहू शकत नाही.’ तो लवकर बरा व्हावा अशीच इच्छा यावेळी प्रीतीने व्यक्त केली.