‘टार्झन: द वंडर कार’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ नुकताच विवाहबंधनात अडकला. मुंबईतील इस्कॉन मंदिरात त्याने अभिनेत्री इशिता दत्ताशी लग्न केले. ‘दृश्यम’ या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिताला वत्सल गेल्या काही महिन्यांपासून डेट करत होता. लवकरच ही अभिनेत्री कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
वाचा : ‘पद्मावती’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता
कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने वत्सल – इशिताचा लग्नसोहळा पार पडला. तसेच काही बॉलिवूड सेलिब्रिटीही या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. मात्र, या लग्नाला इशिताचा सहकलाकार कपिल शर्मा उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याच्या न येण्याने अनेक चर्चांना उधाण आले. याविषयी कपिलला विचारले असता तो म्हणाला की, सध्या मी कामात बराच व्यस्त असल्याने इशिताच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. पण मी तिला फोन करून नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इशिता – वत्सलच्या लग्नाला काजोल, अजय देवगण, तनुजा, तनीषा, बॉबी देओल आणि सोहेल खान यांच्यासह आणखी काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
वाचा : आता नर्गिस फाख्री आणि उदय चोप्रा चढणार लग्नाच्या बोहल्यावर?
सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ‘लाफ्टरक्वीन’ भारती सिंग येत्या ३ डिसेंबरला प्रियकर हर्ष लिंबाचिया याच्याशी लग्न करणार आहे. कपिलचा ‘फिरंगी’ चित्रपट उद्या १ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे, यावेळी वेळात वेळ काढून तो आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला तरी जाणार का, ते पाहणे औत्सुक्याचे राहील.