‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडियन कपिल शर्मा छोट्या पडद्यापासून जरी काही काळासाठी दूर गेला असला तरी तो लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा आणि कपिलची भूमिका हटके आहे हे लक्षात येतं.
कपिल एका लहान मुलीला झोपण्यापूर्वी गोष्ट सांगतोय, अशा दृश्याने या ट्रेलरची सुरुवात होते. जणू काही तो आपलीच कथा त्या मुलीला सांगत आहे. पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या मंगा या व्यक्तीची ही कथा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील बहुतांश लोक इंग्रजांचा विरोध करत असतानाच मंग्याला मात्र त्यांच्याविषयी आपुलकी असते. इंग्रजांकडे त्याला नोकरीसुद्धा मिळते. मात्र, यामुळे गावातील इतर लोक त्याचा द्वेष करत असतात.
अभिनेत्री मोनिका गिल यामध्ये कपिलच्या नायिकेची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमधील काही दृश्य पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की उमटेल. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये कपिल एका व्यक्तीला लाथ मारताना दिसला. त्याचं कारण ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. लाथ मारून पाठीतील दुखणं दूर करण्याचं काम तो करत असतो.
वाचा : ‘गोलमाल अगेन’ची गाडी सुसाट; ४ दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार
लहान मुलीला सांगत असलेली कथा कपिल अर्ध्यावरच थांबवतो. आता त्यापुढे नेमकं काय होतं, कपिलच्या प्रेमसंबंधात कोणते ट्विस्ट येणार आणि त्यातून तो मार्ग कसा काढणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. राजीव धिंग्रा दिग्दर्शित आणि कपिल शर्मा निर्मित हा चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.