अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा या दिवाळीला चाहत्यांना एक खास भेट देणार आहे. कपिलची तब्येत बरी नसल्याने त्याचा ‘फॅमिली टाइम विथ कपिल’ हा शो एप्रिलमध्ये अचानक बंद झाला होता. कपिल पुन्हा कमबॅक कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली असून सोनी टीव्हीवर ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत कपिलने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

‘सोनी टीव्हीवर ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे,’ असं कपिलने ट्विटमध्ये लिहिलं. सोनी टीव्हीनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कपिल पुनरागमन करण्याची शक्यता आहे. या नवीन कार्यक्रमाची संकल्पना कशी असेल यावर सध्या विचार सुरू आहे. त्याचबरोबर कपिलसोबत आणखी कोणते कलाकार असतील त्याचीही घोषणा लवकरच करण्यात येईल.

वाचा : दिशा- टायगरचं ब्रेकअप; तीन वर्षांचं नातं संपुष्टात

सध्या कपिल त्याच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहे. शोमध्ये परतण्यासाठी त्याला जवळपास १५ किलो वजन कमी करायचे आहे. व्यसनमुक्तीसाठी तो गेले काही दिवस बंगळुरू इथल्या एका आयुर्वेदिक आश्रमात होता. २८ ऑक्टोबर रोजी तो मुंबईत परतला असून शोसाठी जोमाने तयारी करत असल्याचं कळतंय. कपिलच्या कमबॅकच्या बातमीने चाहते आनंदित असून सोशल मीडियावर त्याला भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.