कपिलचा बालमित्र चंदन प्रभाकर ज्याप्रमाणे म्हणतो की कपिल शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त बातम्यांमध्ये असतो त्याप्रमाणे कपिलसंदर्भात रोज नवीन चर्चा ऐकायला मिळतात. दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने कपिल शर्मा शाहरूख आणि अनुष्कासोबत त्याचा कार्यक्रमाचं चित्रीकरण करू शकला नव्हता. त्यावेळी शाहरुख आणि कपिलमध्ये वाद झाला की काय अशी चर्चा ऐकायला मिळत होती. त्याचप्रमाणे ‘फिरंगी’ या चित्रपटाची शूटिंगही त्याने रद्द केल्याची बातमी होती. या सर्व चर्चांना उत्तरे देण्यासाठी कपिल शर्माने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. या लाईव्हदरम्यान त्याने सुनील ग्रोवरसोबत झालेल्या वादाचाही उल्लेख केला.
शाहरूखसोबतचा भाग शूटिंग रद्द करण्यामागचे कारण सांगताना कपिल म्हणाला की, ‘शूटिंगमध्ये आम्ही व्यस्त होतो आणि अचानक तब्येत बिघडल्याने मला चक्कर आली. कामाचा ताण जास्त झाल्याने माझ्या आरोग्यावर परिणाम झाला.’ सुनील आणि कपिलचा वाद बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असल्याने या फेसबुक लाईव्हदरम्यान सुनिल शोमध्ये कधी परतणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कपिल म्हणाला की, ‘सुनील माझा मित्र आणि भावासारखा आहे. मीसुद्धा त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. बघू आता काय होतेय ते. त्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो शोमध्ये परत येऊ शकतो.’ कपिल शर्मा प्रसिद्धी हाताळू शकला नाही असे, एकाने म्हटले असता त्यावर कपिलने उत्तर दिले की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. त्यामुळे हे खरे नाही. किंबहुना नेमके काय झाले याची कोणाकडेच खरी माहिती नाही. मला कधी संधी मिळाली तर मी नक्कीच त्याबद्दल समजावून सांगेन.’
आपल्यासंदर्भात माधम्यांमध्ये अनेक गोष्टी विपर्यास करून दाखवल्या जातात आणि अनेक डिजीटल वाहिन्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात असे कपिलचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियाहून परतत असताना विमानात झालेल्या वादासंदर्भातही कपिलने स्पष्टीकरण दिले. ‘माझ्याआधी जेवल्याबद्दल मी टीमवर रागावलो अशी सगळीकडे चर्चा होती मात्र मीसुद्धा त्याच विमानात होतो. दुसऱ्या विमानातून मी काही तिथे आलो नव्हतो’, असे कपिलने म्हटले. मी त्या वादावर प्रतिक्रिया देत नसल्याने माझ्याबद्दल अफवा पसरवत मला डिवचण्याचा प्रयत्न करत होते, असेही कपिल म्हणाला.
वाचा : ‘प्रियांकाच्या कपड्यांवरून मोदींना काहीच तक्रार नव्हती’
सुनील ग्रोवरसोबत झालेल्या वादामुळे कपिल शर्माला काहीच फरक पडला नाही आणि घटनेनंतरही तो उद्धटपणे वागला असेही अनेकांचे म्हणणे होते मात्र यावर कपिलने उत्तर दिले की, ‘मीसुद्धा भावूक होतो. शूटदरम्यान अनेकदा माझ्या चेहऱ्यावर ते दिसूनही येते. मलासुद्धा सर्वांची खूप आठवण येते.’ सुनिल ग्रोवरचे नाव न घेता कपिलने त्याची भावना व्यक्त केली.