प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माचा शो बंद झाल्यावर प्रेक्षकांची आणि कपिलच्या चाहत्यांची निराशा झाली. कपिल लवकरात लवकर बरा होऊन शो पुन्हा एकदा सुरु करावा अशी अनेकांचीच इच्छा होती. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र यावेळी कपिल एका दुसऱ्या शोमधून पुनरागमन करणार आहे. या शोचं नाव असेल ‘आदत से मजबूर’.

‘बॉम्बे टाइम्स’च्या माहितीनुसार, ‘कपिलच्या शोच्या सेटवरच याचे काही भाग शूट केले गेले आहेत. तो सुट्टीवर जाण्यापूर्वीच हे शूटिंग करण्यात आलं होतं. या शोच्या काही भागांमध्ये कपिल झळकणार आहे.’ कपिल त्याच्या आगामी ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमधून मोकळा झाल्यानंतर लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे. ‘आदत से मजबूर’ हा शो कधीपासून सुरू होणार याची माहिती अद्याप समोर आली नाही.

वाचा : ‘अंगुरी भाभी’च्या इंग्रजीची हिनाने उडवली खिल्ली; गौहर खानचा चढला पारा

गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा त्याच्या शोमुळे चर्चेत होता. कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारखे कलाकार त्याच्या सेटवरून शूटिंग न करताच परतले होते. वाहिनीला याचा फटका बसत असल्याने त्याला ब्रेक देण्यासाठी कपिलचा शो बंद करण्यात आला. त्यानंतर कपिल बंगळुरुच्या व्यसनमुक्ती केंद्रात दारुचं व्यसन सोडवण्यासाठी ४० दिवसांच्या कोर्सला गेला होता. त्याच्या आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाचं चित्रीकरण अर्धवट राहिल्यामुळे तो फक्त १२ दिवसांमध्ये व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला. नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशन आणि मार्केटिंगसाठीही त्याला वेळ द्यावं लागणार आहे.