टीव्हीवरील विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांच्या आवडीचा ठरलेला अभिनेता कपिल शर्मा लवकरच एक नवा शो घेऊन येतो आहे. या नव्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. नव्या कार्यक्रमात कलाकारांबरोबरच राजकारण्यांनाही आमंत्रित करण्याचे त्याने ठरवले आहे. नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये आले तर आपल्याला खूप आनंद होईल. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे कपिलने म्हटले आहे.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ बंद झाल्यानंतर कपिल शर्मा नव्या वाहिनीवर ‘द कपिल शर्मा शो’ हा नवा कार्यक्रम घेऊन येतो आहे. याच कार्यक्रमामध्ये त्याला नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करायचे आहे. अमेरिकेमध्ये एलनच्या कार्यक्रमामध्ये तेथील राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सहभागी झाले होते. त्याप्रमाणे आपल्या या नव्या कार्यक्रमामध्ये राजकारण्यांना बोलावण्याची इच्छा असल्याचे कपिलने म्हटले आहे.
जर मोदी माझ्या कार्यक्रमात आले तर आम्ही राजकारणाबद्दल किंवा पक्षाबद्दल काहीही बोलणार नाही. पण देशातील एका छोट्या गावातून एक व्यक्ती पुढे येऊन देशाचा पंतप्रधान बनतो. हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. याबद्दल त्यांच्याशी बोलायला मला आवडेल, असे कपिलने म्हटले आहे.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ बंद झाल्यामुळे मला नवं काहीतरी करायला मिळालं. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला अजिबात वाईट वाटत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2016 रोजी प्रकाशित
कपिल शर्माला त्याच्या नव्या शोमध्ये नरेंद्र मोदींना आणायचंय!
कपिल शर्मा नव्या वाहिनीवर 'द कपिल शर्मा शो' हा नवा कार्यक्रम घेऊन येतो आहे
Written by वृत्तसंस्था

First published on: 02-03-2016 at 12:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma wants to have narendra modi on his new show