विनोदवीर सुनील ग्रोवर ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कधीनाकधी पुन्हा परतणार अशी आस कपिल शर्माला अजूनही आहे. सुनीलने पुन्हा शोमध्ये परतावे अशी कपिलची अजूनही इच्छा आहे. काही महिन्यांपूर्वीच सुनीलने अली असगर, सुगंधा मिश्रा आणि चंदन प्रभाकर यांच्यासह ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकल्याचे सर्वांनाच माहित आहे. विमानप्रवासात कपिलने केलेल्या अपमानानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. कपिलने ट्विटरवरून सुनीलची जाहीर माफी मागितली होती. तसेच, सुनीलची मनधरणी करण्यासाठी तो त्याच्या घरीदेखील गेला होता. मात्र, सुनील आणि त्याचे इतर सहकारी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. इतकेच नव्हे तर ऋषी कपूर आणि राजू श्रीवास्तव यांनीही दोन्ही विनोदवीरांमधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

वाचा : ‘आपल्याला चोरी करण्याचीच सवय लागली आहे’

ट्विटरवर एका नेटिझनने कपिलला प्रश्न केला की, सुनीलला शोमध्ये कधी परत आणणार आहेस? या प्रश्नाला उत्तर देत कपिलने लिहिलं, जेव्हा कधी त्याची इच्छा असेल. मी त्याला किती तरी वेळा परत येण्यास सांगितले. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये कपिलने सुनीललादेखील टॅग केले आहे. यावरून हेच दिसून येते की, अजूनही सुनीलने शोमध्ये परत यावे अशीच कपिलची इच्छा आहे. कपिलसोबतच्या वादानंतर प्रेक्षकांचा कल सुनीलच्या बाजूनेच दिसला. तेव्हापासून चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम द्विगुणीत झाले आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच कपिलला डावलून सलमानने ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनसाठी सुनीलच्या शोला प्राधान्य दिल्याचे दिसतेय.

वाचा : करणच्या दुसऱ्या बायकोशी बिपाशाचा जिव्हाळा

सध्या, सुनील लाइव्ह शो करत असून संपूर्ण जगाला तो वेड लावण्यासाठी सज्ज आहे. मात्र, कपिलची परिस्थिती आता बिकट असल्याचेच चित्र आहे. टीआरपीमध्ये कपिलच्या शोला मोठा फटका बसल्याने टॉप १०च्या यादीतूनही हा शो बाहेर पडला होता. सुनीलच्या एक्झिटनंतर शोच्या टीआरपीमध्ये बरीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहिनीनेदेखील सुनीलशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अधिक मानधनासह यापुढे कपिलशी तुझा संपर्क येणार नाही याची आम्ही संपूर्ण काळजी घेऊ, असेही त्यांनी सुनीलला सांगितले. मात्र, सुनील त्याच्या निर्णयावरून हलला नाही.