करण जोहरने या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘ड्राईव्ह’ चित्रपटाची घोषणा केली होती. जॅकलिन फर्नांडिस आणि सुशांत सिंग राजपूत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असंही त्याने सांगितलं होतं. चित्रपटाबद्दल जास्त माहिती न सांगता यामध्ये जॅकलिन स्ट्रीट रेसरच्या भूमिकेत दिसणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. करण जोहरने नुकतंच ‘ड्राईव्ह’चं पहिलं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं असून, पुढच्या वर्षी २ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले.

‘स्टार्ट… झूम… अॅक्सिलरेट,’ असं कॅप्शन त्याने या पोस्टरला दिलंय. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत. याआधी त्यांनी ‘दोस्ताना’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाविषयी तरुणने ट्विट केले की, ‘सात वर्षे, ३४५ दिवसांनंतर…मी सेटवर परतलोय.’

https://twitter.com/karanjohar/status/890096579855736832

वाचा : ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी पेट्रोल पंपावर करायची काम

‘जुडवा २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या जॅकलिननंही ट्विटरवर हा पोस्टर शेअर करत, ‘हा एक रोमांचक ड्राईव्ह असेल’ असं कॅप्शन दिलंय. चित्रपटातील भूमिकेसाठी ती सध्या स्ट्रिट रेसिंग शिकतेय. पोस्टर आणि जॅकलिनच्या भूमिकेवरून या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही. पटकथेबाबत सध्या काही माहिती मिळाली नसली तरी सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिनची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळणार हे नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या जॅकलिन ‘अ जेंटलमन’ चित्रपटात व्यग्र असून, दुसरीकडे सुशांत सिंग राजपूतने ‘चंदा मामा दूर के’ चित्रपटातील भूमिकेसाठी नासामध्ये ट्रेनिंग घेतली. या चित्रपटात तो अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे.