निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या वाढदिवशी आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती दिली होती. ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटानंतर करण पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार आहे. बड्या स्टारकास्टसह त्याचा आगामी ‘तख्त’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तख्त’ हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. यामध्ये मुघलांची कथा दाखवण्यात येणार असून रणवीर सिंग आणि विकी कौशल भावंडांची भूमिका साकारणार आहेत. रणवीरच्या बहिणीच्या भूमिकेत करिना, तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आलिया आहे. विशेष म्हणजे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा विकी कौशल यामध्ये औरंगजेबच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1027372913983275008

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तख्त’ म्हणजेच सिंहासन. सिंहासनासाठी दोन भावंडांमधील वादाची ही कथा असणार आहे. शाहजहान आणि मुमताज यांच्या मुलांच्या जीवनाभोवती ही कथा फिरणारी आहे. रणवीर, करिना आणि विकी कौशल त्यांच्या मुलांच्या भूमिकेत आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ऐतिहासिक कथानकावर आधारित बिग बजेट चित्रपट आणि त्यासोबतच मोठी स्टारकास्ट यांमुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.