दिग्दर्शक करण जोहर हा नेहमी आपल्या सिनेमांमध्ये स्टार किड्सना प्राधान्य देताना दिसतो. पण त्याला खऱ्या गुणांचीही जाण आहे. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांचेच पाहा ना.. करणमुळेच बॉलिवूडला ही दोन रत्ने मिळाली. आता करणची नजर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर पडली आहे. करणला विराटचा अभिनय फार आवडल्याचे त्याने त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवरुन सांगितले.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जाहिरात करणने पाहिली आणि त्याला ही जाहिरात फारच आवडली. जाहिरात पाहून त्याने दिग्दर्शक अभिषेक वर्मन आणि विराटचे भरभरून कौतुक केले. ‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, करण त्याच्या आगामी सिनेमामध्ये विराट कोहलीला घेण्यास उत्सुक आहे. आता विराट हिरो झाला तर त्याची हिरोईन अर्थातच अनुष्का असेल यात काही शंका नाही.
जर खरेच असे झाले तर विराटच्या चाहत्यांना हे कितपत आवडेल याबाबत शंकाच आहे. तसेच यावर्षी डिसेंबरमध्ये विराट अनुष्कासोबत साखरपुडा करणार असल्याच्याही बातम्या येऊ लागल्या होत्या. विराटने वैयक्तिक कारणांमुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंका कसोटी मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला होता. विश्रांतीसाठी त्याने बीसीसीआयकडे सुट्टीचा अर्ज टाकला होता पण त्याची ही मागणी फेटाळण्यात आली असून श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. सुट्टीचा अर्ज फेटाळल्यामुळे विराट- अनुष्काच्या साखरपुड्याच्या बातमीवर काही अंशी पाणी फिरल्याचे दिसते.
https://twitter.com/karanjohar/status/921413759477805056
गेल्या काही वर्षांपासून विराट आणि अनुष्का रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतानाही दिसतात. तसेच विराटच्या अनेक सामन्यांमध्ये अनुष्का आवर्जून हजेरी लावताना दिसते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी प्रसारमाध्यमांशी सामना झालाच तर एकत्र फोटो देतानाही ते कचरत नाहीत. या सगळ्यात दोघे एकत्र सिनेमा करण्याची बातमी असो किंवा त्यांच्या साखरपुड्याची, या दोन्ही बातम्यांनी त्यांचे चाहते खूश होतील यात काहीच शंका नाही.