बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये गेला होता. या शोमध्ये त्याने फक्त त्याच्या अभिनयाबद्दलच चर्चा नाही केली तर बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांचे गुपितही उघड केले.
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानबद्दल बोलताना तो म्हणाला की, शाहरुख दर दिवशी बाथरुममध्ये किमान चार तास घालवतो. आलिया भट्टला ती हुशार असल्याचेही त्याने म्हटले. करिना कपूरबद्दलही त्याने अनेक गोष्टी सांगितल्या. करिना कपूर खान सिनेसृष्टीतले गॉसिप शोधून काढते आणि भाऊ रणबीर कपूरला सांगते. मग रणबीर त्याच गोष्टी इतरांमध्ये सांगतो.

दीपिकाबद्दल सांगताना तो म्हणाला की ती फारच भावूक आहे आणि ती सहज रडू शकते. करणने ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमात एक नकारात्तूमक भूमिका साकारली होती. हा सिनेमात बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. याबद्दल बोलताना करण म्हणाला की, मला असे काही करायचे होते की लोकांनी माझ्याकडून त्याची कधी अपेक्षाच केली नसेल. पण सिनेमाला जी प्रतिक्रिया मिळाली, त्याचीही मला अपेक्षा नव्हती. या सिनेमानंतर करणला कोणत्याच सिनेमात अभिनयासाठी विचारले गेले नाही.

दरम्यान, ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये बॉलिवूडची मिस हवाहवाई, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसू शकते असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सिनेवर्तुळात सध्या याबाबतची चर्चा होत आहे. याआधीही जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा बदलणारा आणि प्रेक्षकांसमोर विविध सिनेमांचा नजराणा सादर करणाऱ्या करण जोहरचे नाव ‘सैराट’च्या हिंदी रिमेकसोबत जोडले गेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ‘सैराट’ सिनेमाचे हक्क खरेदी केले आहेत.