दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ अभिनेते राजीव कपूर यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. राजीव कपूर यांच्या निधनानंतर चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक कलाकरांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राजीव कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे राजीव कपूर यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला. “मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय”, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे.

अभिनेत्री करिना कपूर खानने देखील काका राजीव कपूर यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तिने एक फोटो शेअर करत ‘मन स्थिर नाही पण तरीही खंबीर आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना चेंबूरमधील Inlaks Hospital रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून राजीव कपूर यांनी कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘एक जान हैं हम’, ‘राम तेली गंगा मैली’, ‘आसमान’, ‘लवर बॉय’, ‘जबरदस्त’, ‘हम तो चले परदेस’ हे त्यांचे चित्रपट गाजले. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते.