बॉलिवूडची बेबो करीना कपूर सध्या तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चेत आली आहे. करीना कपूरने तिच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा खुलासा केलाय. करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं कळताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. अनेकांनी जहांगीर या नावावरुन करीना आणि सैफला ट्रोल केलं.

या आधी करीना आणि सैफने दुसऱ्या मुलाचं नाव ‘जेह’ ठेवल्याचं वृत्त समोर आलं होतं. जेह या नावावर कुणीही हरकत घेतली नसली तरी सैफिनाच्या मुलाचं खरं नाव जहांगीर असल्याचं कळताच नेटकऱ्यांनी करीनावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यावर आता करीना कपूरने अखेर तिचं मौन सौडलंय. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. नकारात्मकतेकडे मी लक्ष देत नाही. कोव्हिडने सगळ्यांना जवळ आणलं आपण या बद्दल विचार करायला हवा. राहिला प्रश्न ट्रोलर्सचा तर त्यांना हाताळण्यासाठी मला ध्यान करावं लागेल. आपण दोन लहान निरागस मुलांबद्दल बोलतोय याचा जरा विचार करा.” असं करीना म्हणाली.

हे देखील वाचा: “…तर तुम्ही गाढव आहात”, मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्कर संतापली

हे देखील वाचा: “तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना…”; करीना कपूरने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा

करीना कपूर आणि सैफ अली खानने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर या नावामुळे करीना आणि सैफला ट्रोलही करण्यात आलं होतं. सैफ करीनाने भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूर या प्रशासकाचं नाव का ठेवलं असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफिनावर निशाणा साधला होता. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा सैफ आणि करीनाला ट्रोल केलं.